ती वाट बघतेय

ती वाट बघतेय.... गोव्यात प्रत्येक गावात एक सरकारी प्राथमिक शाळा आहे.आमची पिढी ह्याच सरकारी शाळां मधुन शिकली.पहील्यांदाच पहीलीत, पहील्याच शाळेत जातानाची ती बालमनाची घालमेल,उत्सुकता,हुरहुर थोडीशी भिती अशा नानाविविध भावनांचा हिंदोळा त्या बालवयात प्रत्येकाच्या मनात असायचा.आपण सर्वांनीच त्याचा अनूभव घेतला आहेच. गोव्यातल्या सर्वच सरकारी प्रा.शाळा ह्या तशा गावात, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या.शाळेत जाता येता गावातली जाणती माणसं,शेती साठी लगबग करणारे शेतकरी,सकाळी सकाळी शाळेत जाताना गाई,त्यांची चिमुकली वासरं,बैलांच होणारं दर्शन सारचं काही अनमोल.नविन मित्र,नविन शिक्षक,नवी पाटी, पेन्सील.नवीन पायल चप्पल,सगळच काही नविन,वातावरणच भाराऊन जाणारं व मग अंगळवाणी पडल्यानंतर गावची शाळा कधी आपलं कटुंब बनुन जायची कळायचीच नाही. पावसातल्या दिवसातला पहीला पाऊस,मातीचा सुगंध,छ्त्री असुनही हळूच भिजण्यासाठीचा प्रयत्न ,पावसात बाहेर खेळता येत नाही म्हणून "गुण्यानी खेळणे",हिरांनी खेळणे,मध्येच तासाला "गुरुजी एकी" म्हणून करंगळी दाखऊन एकीला जाणे(त्यावेळी शाळांना शौचालये नव्हती हो,सगळचं निसर्गात),पावसात चिखलात, खेळणे,छत्रीच्या मागच्या स्टीलच्या टोकाने झरे फोडणे व त्या झरयावर आपला मालकी हक्क गाजवणे .बोरं,तोरं(कैरी),जगमं,चिंचेच्या कोंगलांनी डेस्क व दप्तराचे खीसे भरलेले असायचे.काजूच्या दिवसात काजुनी खेळणं,गडड्यानी खेळणं,गोट्यानी खेळणं व मधल्या सुट्टीत येणारा तो टीणीटीणी करणारा आइसफ्रुटवाला,पेप्सीवाल्याची आतूरतेनं वाट बघणं सगळ कसं अजूनही लख्ख आठवतं. सरस्वती पुजनाची लगबग तर वेगळीच.पाटीवर सरस्वती काढून नेण,रोज पाळीनुसार सकाळी शाळेत जाताना सरस्वतीच्या फोटोला फुलांचा हार करून नेणं,जणू शाळा हे मंदिर, शिकवणारे गुरुजी/बाई म्हणजे पुजारी व आम्ही म्हणजे निरागस भक्त. आमच्या वेळी गोव्याच्या किंबहूना कोकणातल्या सरकारी प्राथमिक शाळेत शिकलेल्यांच्या आठवणी या अशाच कमी अधीक प्रमाणात असणार,नव्हे आहेत.किती निसर्गरम्य बालपण ते.गावातलं गावपण जपणारे संस्कार मिळाले त्या शाळेतून.आज आपण जे काही आहोत ते त्या प्राथमिक शाळेच्या पुण्याईवर असं नाही का वाटत?? आता तर ही शाळा एकदम सुसज्ज,सुंदर,शौचालयाच्या सोयीनी युक्त अशी सुशोभीत झाली आहे. बाहेरून कीती सुंदर दिसते आपली शाळा. पण खरं सांगू???ती आतून रडते आहे.तीला आमची आठवण येते आहे. ती आम्हाला miss करत आहे.तीच्या अंगा खांद्यावर खेळून,आम्ही तीच्या आशिर्वादाने मोठे झालो,पण मनुष्य स्वभावानुसार एवढे व्यस्त झालो की तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष कधी झालं कळलचं नाही. ती अजनूही आमची वाट बघते आहे.पाऊस सुरू झाला की ती आज नटून थटून वाट बघत असते,आपल्या अंगाखांद्यावर खेळायला गावातली मुलं येणार, *तीला मातृत्वाचा पान्हा फुटतो हो दर पावसाळ्यात* ,ती वाट बघत असते गावतल्या मुलांच्या अ आ इ ई ,बे एके बे बे दुने चार च्या बालसुलभ बोबड्या बोलांनी आपल्या कानाच्या तृप्तीची. पण जमान्या प्रमाणे आता आम्हाला तीची लाज वाटू लागली आहे. Modernisation व English च्या भ्रामक प्रेमापोटी आपण तिच्या पासून अपलं नातं तोडलं आहे.तीला सोडून आपल्याला शहरातल्या चकचकीत शाळा आपल्या वाटू लागल्या आहेत. चित्रपाटात एखाद्या कथेत सुशीक्षीत मुलाला आपल्या गावातल्या आईबाबांची लाज वाटू लागते म्हणून तो त्यांना गावातच सोडून जातो कींवा वृद्धाश्रमात नेऊन ठेवतो तेव्हा आम्हाला कीती राग येतो ना त्या मुलाचा व करूणा वाटते त्या आईबापांची?? आपल्या डोळ्यात चटकन अश्रू येतात नकळत. आपल्या गावातल्या प्राथमिक शाळेच्या बाबतीतही आपण तसेच तर वागत नाही आहोत ना??? ती वाट बघतेय आपल्या नातवंडांची,पतवंडांची......... मग या वर्षी नेऊया ना आपल्या मुलांना तिच्याकडे ??? ती वाट बघतेय..............

Comments